Wednesday, December 28, 2011

मार्केट

दुःखाची करंगळी धरून चालतोस कशाला?
सोड ना बोट चाल ना एकटा..
या रंगीत चोची टोचणारच ना राव
तुम्ही टोचून घ्या अँन्टी काहीतरी
                      अगऽऽ माझे बाय तुला माझी आठवण झालीच कशी???
                      फॉरमॅट मारून घे मेंदूला
                      भावडया गाऊ नको इश्काची गाणी
                      डोळ्यातल्या पाण्याला
                      मार्केट नाय.... 

Thursday, December 1, 2011

फरपट..

आपल्यामधील शांतता बोलकीये


सांगू पाहतेय एकमेकांना आपल्यामधील निर्माण झालेल्या अंतराबाबत


मधोमध एक सीमारेषा आहे अंधुकशी पुसट..ती आहे मात्र सत्य...


दरवेळी आपण उभे येवून ठाकतो सीमारेषेवर अन् स्तब्ध होतो थिजून जातो दगडासारखे


अशा वेळी शब्द अनाथपणे घोटाळत बिलगत राहतात पण


आपण फक्त अंदाज घेत राहतो एकमेकांच्या अस्तित्वाचा अन् निमूटपणे परततो माघारी हिरमुसलेले


गोठ्यात परतावी गाय करुण डोळे घेवून जसे अन् दावणीला बांधून घेतो स्वतःला रोजच्या रहाटगाडग्याला


दररोजचा दिवस


एक नकोशी सवय


एक नकोशी चालढकल, फरपट.....

Friday, November 25, 2011

रघू दंडवते यांची झूठी कबर वाचून

येथे प्रत्येकाला आपण थोर आहोत असा साक्षात्कार होतो


आपण महान असे अधुनमधून वाटत राहते उगीचच येथे


आपल्यावर फार अन्याय झालाय


आपणच खरे ट्रॅजीडी किंग असे मनात येते


प्रत्येकाच्या येथे


खरे सुपरस्टार आपणच आहोत


असे ठणकावून तर कधी कानात सांगतो येथे प्रत्येकजण...


खर तर आपण किती खोल पाण्यात आहोत


हे माहीत असूनही


इतरांची मापे काढतो आपण


मी तर समुद्राचा साधा थेंब म्हणत


आपण ठरवून सर्वोच्च पदाकडे अंतिम कूच करतो


स्वतःच स्वतःला फसवत आपण


झूठी कबर होवून बसतो येथे.

जोहार


रोज तुझ्या नावाची जपमाळ चालू आहे
अष्टौप्रहर
दिनक्रम अस्ताव्यस्त पसरलाय खोलीभर
माझ्यासकट
भूतकाळाच दर्दभर संगीत ऐकू येतंय कानांना फक्त
तुझ्यापायी उध्वस्तापणाची बा रा ख डी गिरवतोय
पुन्हा पुन्हा
तुझ्यासमोर गरीब वाटत नशापाणी
तू जालीम तुझ्या जीवघेण्या आठवणी
शरणागतीचे पांढरे निशाण घेवून उभाये दारासमोर तुझ्या
जोहार माझे बाय
जोहार...

Thursday, November 24, 2011

एकूणच

माझ्या कविता वाचून


काहीजण म्हणतील बरीये


अत्यंत बोगस रद्दड


काहींच्या मते..


खोटी आहे भोंदुगिरी नुस्ती


असेही म्हणतील काहीजण


कोणी काही म्हणायच्या आधीच


मीच म्हणवून घेतलय काहीजण


काय म्हणतील या नावाखाली


आणि हे सांगून अमर व्हायचय मला


माझ्या कवितेसकट...


मनाला हेही सांगून ठेवलय की


लोकांची तोंडे शिवता येण अवघड आहे एकूणच...

Wednesday, November 23, 2011

फ्याशन...

विषय साधा सोप्पा सरळ करायचा असतो अवघडप्रतीके पेरत पेरत वाकडे झाड दाखवतलटकवून टाकायचे त्याला एखादे घुबडउगाचच असंबद्ध बडबडतभुंकत राहायचे काही बाहीओढायचा कोरा ताव घ्यायचा नक्षीदार पेनरिती करायची शाही....आशय विषय विसरून शीर्षकालाद्यायचा संदर्भहीन घटस्फोटघालायचा गोंधळ स्वतःचे संबळ वाजवतवाचकाला ठरवायचे अडाणचोटवाढवायची गुंतावळ केसं दाढी मिशाअन् कानानाकात एखादे डूलघालायची चित्रविचित्र कपडेपांघरायची आधुनिकतेची झूलउगाचच भांडायचे परंपरेशीव्यसने रिचवता रिचवताअर्धवट वाचून व्हायचे लाल पिवळेअन् बोंबलत राहायचे नवता नवता...Wednesday, November 16, 2011

औषधमिश्रित सोडा.अस्सा वस्सऽऽऽकन अंगावर येतो ना दिवस
टूथपेस्ट मधल्या पेस्ट सारखा
पसरतो भस्सऽऽकन एकदम
मग बसावे लागते घासत कित्येक काळ.
चूळ भरून कंटाळा बाहेर टाकला तरी
अडकून पडतात कण...
रोजची भणभण सुरु होते
दात कोरून पोट भरायची.
आपल्याला आकडेमोड जमत नाही अन्
जोकरला राणी बधत नाही
रिकाम्या मेंदूचा होतो बेफाम घोडा
दिवसा चार ओळी
रात्रीला औषधमिश्रित सोडा.

गायछाप स्वप्न


निरर्थकता गिरवावी लागतेय क्रमिक...
बिंदू पासून सुरु झालेली रेघ शोधात आहे दुसऱ्या बिंदूच्या
जो सापडत नाही...
एक कर्मठ वेदना चिरंतन सत्य.
एक दुर्बोध आसक्ती अन् आभासमय भय.
हातावर मळतोय मी एक गायछाप स्वप्न .....

Thursday, September 8, 2011

संदर्भथेंबात उतरले ऊन
धम्मक पिवळी नक्षी
पानात सांडले रंग
ओळीत उधळले पक्षी.
जर्द लाल जास्वंदाला
वेल्हाळ पाखरू भुलले
घनगर्द आभाळात
एक भगवे स्वप्न फुलले.
ही वाट गहीरी बाई
अन् पाऊल तुझे नाजूक
रस्त्यात उमलल्या आहे
कोवळ्या कळ्या साजूक.

स्पष्टीकरण


जे दान मिळाले आहे
त्यातच आहे सुख
संपता संपत नाही ही
आदिम मनाची भूक ‌‌

हे अंतर आपल्या मधले
प्रगल्भ नव्या वळणावर
अपूर्ण स्वप्नांमध्येही
एक दुनिया असते सुंदर
शुभ्र टपोऱ्या कळ्या अशा
जपून कोठे मी ठेवू ?
निर्माल्य होण्याआधी चल
मृगजळात सोडून देऊ.....

Monday, August 29, 2011

फाफललो

पोरी ऽऽऽ
तूच तर दिली होती लाईन इष्काची गाणी गाईन
म्हणता म्हणता फाफललो
आली होती भलतीच संधी पण
हातातून निसटली फांदी आत्मविश्वासापाई कोसळलो
घेतलेल्या सोंगाचा वाजला भोंगा
तरी चारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो
बोटं मोडत कित्येक हातांनी दिलेले तळतळाट
तरी डोळे मिटून मिठू मिठू पोपट होत खोटेखोटे झोपलो
उरल्या आयुष्यात रचल्या कविता
म्हटली शायरी, फुल इमोशनल फिल्मी गाणी
एकांत प्यालो
आठवण येता तुझी
गायीच्या करुण डोळ्यात व्याकूळ हंबरून
बुडालो

Thursday, August 11, 2011

डोळे

फर्ग्युसन मधील शेवटच्या वर्षातील
तुझे डोळे स्मरतात भावव्याकूळ
मराठी विभागाबाहेर तिष्टतलेले.......
ज्या बद्दल मी माफ करू शकत नाही स्वतःलाच
तुझ्याशी संवाद साधनार तोच अडकलो आवर्तात
ते दिवस स्मृतीभ्रन्शाचे अन् विनाशाचे होते प्यारी
विसरलो तुझे नाव गाव सोबत फक्त औषधे जहरी
भानावर आलो तेंव्हा झालो एक यंत्र सकाळ संध्याकाळ
फर्ग्युसन मधील शेवटच्या वर्षातील
तुझे डोळे स्मरतात भावव्याकूळ
मराठी विभागाबाहेर तिष्टतलेले.....

Thursday, July 21, 2011

तू अन मी .....

तू म्हणायचास अनुभव घेणं बाप
मग अलाणे, फलाणे, पुस्तके, पी.एच.डी ग्रंथ, रद्दी, वाणसामान.

मी म्हणायचो पुस्तके बाप, पुस्तके गुरू, पुस्तके मित्र,
पुस्तके आयुष्य बाकी सब झूठ है
यार ....

तू म्हणायचा जगणं महत्त्वाचं.
पुस्तकाच्या पानात मावत नाही रे दुनिया
मी म्हणायचो एकदा शिरून पहा पानात
तुला दाखवतो दुनिया, दुनियेच्या आतली दुनिया
असं मी बडबडायचो काहीबाही सतत..

तू म्हणायचास
भानावर ये, बाहेर ये
मी म्हणायचो बेभान हो, खोलवर जा.
तू जमवायचास माणसे अवतीभवती अन् बोलायचास
त्यांच्याशी बरेच काही.
मी पुस्तकांच्या गराड्यात
सोबत घेऊन प्रश्न शोधत बसायचो
काहीबाही.

चुकता आपण भेटत राहायचो एकमेकांना
तुझे चमत्कारिक अनुभव ऐकून
मी स्तब्ध व्हायचा
माझ्या कहाण्या कविता ऐकून
तू चकित....

एकदा तू म्हणालास
एखादे पुस्तक असेल तर दे वाचायला.
आणि मी म्हणालो
चल बसू या भर चौकात
रद्दी विकायला

-भूषण राक्षे

Monday, April 18, 2011

प्रचंड थोर लोक आजुबाजुला ....

थोर थोर लोकांच्या तत्ववादी गप्पा कानावर पडत आहेत .इतकी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेले लोक आजुबाजुला असताना जीव घभ्राघुबरा होवून जातो आजकाल। एकुणच सारे काही महान
आपण आपल्याला दिलेले काम केले तरी खुप काही ......

Thursday, February 10, 2011

यातले तुला काहीच ठाऊक नाही...

एकदा वर्गात कोणीही नसताना
मी तुझे नाव फळ्यावर लिहीले
माझ्या नावासमोर
आणि खिशातल्या रूमालाने पुसून टाकले
डस्टर टेबलावर होता तरीही...
स्वतःपुरते ग्लोरिफीकेशन केले
आणि आनंद घेतला

वर्ग सारा शांत होता त्यावेळी
पण वर्गातल्या टेबलखुर्चीला, बेंचेसला
देवीच्या तसबिरीला आणि कच-याच्या डब्याला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...

मोरपिसासारखा तरंगत होतो त्या दिवशी
घरी येऊन रेडिओवर गाणी ऐकली इश्क मुहोब्बतची
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
वासरा सारखा हूंदडत राहिलो इकडे तिकडे दिवसभर
शांत होऊन घरी आल्यावर
एक पत्र लिहिलं तुला एकांतात
त्या दिवशी झोपही आली नाही रात्री ...

हा सारा दिवस अजूनही आठवतो आहे मला
तुला स्मरायचे कारण नाही
कारण यातले तुला काहीच ठाऊक नाही...

Thursday, January 20, 2011

जन्ता अमर्रेसाक्षर जनता । भूषण भारता

अडाणी जनता । ????
पेडगाव जनता । ????
येडगाव जनता । ????
मर्दानी जनता । ???
मुर्दाड जनता । ????
झापडेबाज जनता । ????
लफडेबाज जनता । ????
बुळी जनता । ????
चुळबुळी जनता । ????
अमीर जनता । ????
फ़कीर जनता । ????
जागृत जनता । ????
अमर जनता । ????

जन्ता अमर्रे

Monday, January 17, 2011

शाळा


आज साळत मास्तर आन् म्या फकस्त
मास्तर तापला बाळ्या बाकीची गबाळ कुठ गेली?
म्या म्हटल धोंड्याची म्हैस येली आन्शाम्याची माय मेली
म्या
चिडीचाप

मास्तर परत खवताळला
बाकीची गायबान कुठ गेली?
म्या म्हटल शिरप्या हिर खनतूया आन्दगड्या उसाला पाणी भरतूया
म्या
चिडीचाप

मास्तर आणिकच पिसाळला
आन् उरली सुरली घुबड कुठ मेली?
म्या म्हटल राधी भाकरी थापतीया आन्काशी धुन धुतीया
मास्तर म्हटला शाना हाईस सगळ्यांचा सातबारा माहीत असतूया तुला
एकला कायला तरफाडला साळत फुकन्या?
म्या
चिडीचाप

मास्तर म्हटला घ्ये लिहून थॉड फार पुस्ताक काढ
म्या म्हटल माझी पाटी कॉनीतरी चोरली फकस्त पुस्ताक हाय माह्यापाशी
मला वाटल मास्तर धडा शिकवीलपण ते आणिकच खवताळल
पळ घरी भूतखान्या उद्या ये पाटी घेऊन एकल्यासाठी टाळ कुटु काय म्या?
आज सुट्टी साळला
मास्तरन साळला टाळा ठोकला आन्पुण्यतीथी हाय म्हणून बोंबा मार म्हटला
पण उद्या साळत येऊन म्या काय करू?
माझा बा मला पाटी देनार पण ती गुराच शान भरायची
मला साळत जायचय पण मास्तर आड हाय आन् बा हिर
.

Friday, January 14, 2011

कळप


कळप करून राहण्याची
प्रवृत्ती पहिल्यापासूनची
रानटी... सनातन...


कुठल्या पुस्तकात वाचले
माहित नाही किंवा
कुठल्या मास्तरनं शिकवलय
वर्गात तेही आठवत नाही...


आपल्या जन्मापूर्वीही
या जगात कळप होते
आणि आपण ढगात गेल्यावरही
ते तसेच राहणार
इतकं मात्र ठसत गेलं
मनावर हळूहळू ...


पुस्तकाबाहेरच्या उघड्या- वाघड्या
नंग्या जगात घरापासूनच
राजकारण सुरु झालं
आईकडचे-वडीलांकडचे, सख्खे-चुलत,
सातबारा उतार्र्याची जमीन,
विहिरीचे पाणी,
आजोबाने बांधलेलं घर
ज्यात नांदत होतं मोठ्ठ खटलं
त्यात नांदत होत्या टोळ्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या नावाखाली...


घराबाहेर आपली पावले
पडली खरी पण
पुसत गेली
प्रत्येक आळीची वाट
ही आमची आळी
ही तुमची आळी ही वरची आळी
ही मधली आळी ही खालची आळी..
जन्माबरोबर चिकटली जात
जत्रेत गोंदवुन घ्यावी तशी
जी खोड़ता येणार नव्ह्ती
मरेपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीही
अगदी कोणीही
स्वतःसकट, मनापासून- मन मारून


जातीत राहून
फायदेही झाले आणि तोटेही
अंगात संचारला अहंकार आणि
स्वतःबद्दलची किळसही
आपण जातीच्या कोशात राहीलो
सुरक्षित, धुसमुसत अन भयभीतही


मानसिक-शारीरिक पातळीवर चालणारी
टोळयांची युद्धे आपण पाहिली
घरादारात लहानपणापासुन
प्रत्यक्ष अनुभवली हिंसा कित्येक रुपात
आपण आयते सापडलो
कळपात-टोळयात ...
तर कधी जाणीवपुर्वक सामील झालो...
कधी कधी नाईलाज सुद्धा होता आपला...


घसा फाटेस्तोवर घोषणा दिल्या
"टिंब टिंब की जय" म्हंटल
ताशे नगारे ढोल बेन्जो वाजवले
उत्सव साजरे केले जोरजोरात....
दबक्या हळु आवाजाताही आपण
एकी बांधली आपल्यापुरतीच
आपल्या विरोधात बंडाचे झेंडे घेउन आपलेच उभे
राहिले तेव्हा तितक्याच क्रुरपणे
आपण चिरडले
एखाद्या चिलटासारखे त्यांना
आणि ऐकीच बळ असं भलत्याच
कारणासाठी वापरल
आपली व्यवस्था पुन्हा घट्ट होण्यासाठी...


आपण ऐकमेकांत युद्धे केली
शह काटशहाचे राजकारण केले
रक्तपात केले एकाबाजूने
तर दुस-या बाजूने चिमुटभर फायद्यासाठी
परस्परात तह केले, युती केली, करार केले
छुप्यापणे किंवा उघडपणे...


आपल्या टोळयात आपण रंगीत चष्मे वाटले
आणि त्यातुन जगाकडे पहावे असा फतवा काढला
ज्यांनी चष्मे वापरायचे नाकारले त्यांचे डोळे काढले आपण
प्रत्येकाने सुधारणेची
भाषा केली असली तरी
छुप्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर
प्रत्येकाने तितकाच समसमान
कर्मठ पणा पाळला
मूळ संकल्पनांची सुरनळी केली
अन भोंदुपणा ओकत राहिलो


आपण भाषा शिकलो
स्वतः ची परक्याची
अमक्याची तमक्याची
शुद्ध अशुद्ध
फायद्याची तोट्याची
तसेच आपण इतिहास आणि
तत्वज्ञानाचेही
धड़े गिरवले...


आपण बर्र्याचादा चुकीचे असुनही
बरोबर कसे आहोत हे आत्मविश्वास पूर्वक सांगितले
तर कधी चुक बरोबर म्हणजे नेमके काय
यावर गोंधळ घातला
अन प्रश्नांचे घोंगडेच भिजत ठेवले ...
आपण बरोबर असून इतर कसे चुकीचे आहेत
यावर लंबी लंबी व्याख्याने भाषणे दिली
लेख लिहिले कादंब-या रचल्या,
नाटके चित्रपट केले...


कित्येक मूळ मुद्दे, तत्त्व, प्रश्न जाणवत असुनही
आपण त्याकडे सोइस्करपणे डोळेझांक केली
तर बिन महत्वाचे फसवे मुद्दे
मोठे करीत राहीलो, चघळत राहीलो
तर कधी रवंथ करीत राहीलो


आपण असे बरेच काही केले...
आपले जन्माला येणे आणि मरणे
हेच मूळात आपल्या हाती नव्हते
तरीही या दोघांच्या मधात
जो बुद्धिपुर्वक
( डोके असल्याने )
आपण जो उद्योग केला त्याचे काय???

Monday, January 3, 2011

फ्लेक्स

भूषण राक्षे यांच्या प्रदीर्घ
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

शुभेच्छुक :- भूषण राक्षे