Monday, August 29, 2011

फाफललो

पोरी ऽऽऽ
तूच तर दिली होती लाईन इष्काची गाणी गाईन
म्हणता म्हणता फाफललो
आली होती भलतीच संधी पण
हातातून निसटली फांदी आत्मविश्वासापाई कोसळलो
घेतलेल्या सोंगाचा वाजला भोंगा
तरी चारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो
बोटं मोडत कित्येक हातांनी दिलेले तळतळाट
तरी डोळे मिटून मिठू मिठू पोपट होत खोटेखोटे झोपलो
उरल्या आयुष्यात रचल्या कविता
म्हटली शायरी, फुल इमोशनल फिल्मी गाणी
एकांत प्यालो
आठवण येता तुझी
गायीच्या करुण डोळ्यात व्याकूळ हंबरून
बुडालो

Thursday, August 11, 2011

डोळे

फर्ग्युसन मधील शेवटच्या वर्षातील
तुझे डोळे स्मरतात भावव्याकूळ
मराठी विभागाबाहेर तिष्टतलेले.......
ज्या बद्दल मी माफ करू शकत नाही स्वतःलाच
तुझ्याशी संवाद साधनार तोच अडकलो आवर्तात
ते दिवस स्मृतीभ्रन्शाचे अन् विनाशाचे होते प्यारी
विसरलो तुझे नाव गाव सोबत फक्त औषधे जहरी
भानावर आलो तेंव्हा झालो एक यंत्र सकाळ संध्याकाळ
फर्ग्युसन मधील शेवटच्या वर्षातील
तुझे डोळे स्मरतात भावव्याकूळ
मराठी विभागाबाहेर तिष्टतलेले.....