Thursday, July 21, 2011

तू अन मी .....

तू म्हणायचास अनुभव घेणं बाप
मग अलाणे, फलाणे, पुस्तके, पी.एच.डी ग्रंथ, रद्दी, वाणसामान.

मी म्हणायचो पुस्तके बाप, पुस्तके गुरू, पुस्तके मित्र,
पुस्तके आयुष्य बाकी सब झूठ है
यार ....

तू म्हणायचा जगणं महत्त्वाचं.
पुस्तकाच्या पानात मावत नाही रे दुनिया
मी म्हणायचो एकदा शिरून पहा पानात
तुला दाखवतो दुनिया, दुनियेच्या आतली दुनिया
असं मी बडबडायचो काहीबाही सतत..

तू म्हणायचास
भानावर ये, बाहेर ये
मी म्हणायचो बेभान हो, खोलवर जा.
तू जमवायचास माणसे अवतीभवती अन् बोलायचास
त्यांच्याशी बरेच काही.
मी पुस्तकांच्या गराड्यात
सोबत घेऊन प्रश्न शोधत बसायचो
काहीबाही.

चुकता आपण भेटत राहायचो एकमेकांना
तुझे चमत्कारिक अनुभव ऐकून
मी स्तब्ध व्हायचा
माझ्या कहाण्या कविता ऐकून
तू चकित....

एकदा तू म्हणालास
एखादे पुस्तक असेल तर दे वाचायला.
आणि मी म्हणालो
चल बसू या भर चौकात
रद्दी विकायला

-भूषण राक्षे