Thursday, September 8, 2011

संदर्भ



थेंबात उतरले ऊन
धम्मक पिवळी नक्षी
पानात सांडले रंग
ओळीत उधळले पक्षी.
जर्द लाल जास्वंदाला
वेल्हाळ पाखरू भुलले
घनगर्द आभाळात
एक भगवे स्वप्न फुलले.
ही वाट गहीरी बाई
अन् पाऊल तुझे नाजूक
रस्त्यात उमलल्या आहे
कोवळ्या कळ्या साजूक.

स्पष्टीकरण


जे दान मिळाले आहे
त्यातच आहे सुख
संपता संपत नाही ही
आदिम मनाची भूक ‌‌

हे अंतर आपल्या मधले
प्रगल्भ नव्या वळणावर
अपूर्ण स्वप्नांमध्येही
एक दुनिया असते सुंदर
शुभ्र टपोऱ्या कळ्या अशा
जपून कोठे मी ठेवू ?
निर्माल्य होण्याआधी चल
मृगजळात सोडून देऊ.....