Monday, April 18, 2011

प्रचंड थोर लोक आजुबाजुला ....

थोर थोर लोकांच्या तत्ववादी गप्पा कानावर पडत आहेत .इतकी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेले लोक आजुबाजुला असताना जीव घभ्राघुबरा होवून जातो आजकाल। एकुणच सारे काही महान
आपण आपल्याला दिलेले काम केले तरी खुप काही ......

Thursday, February 10, 2011

यातले तुला काहीच ठाऊक नाही...

एकदा वर्गात कोणीही नसताना
मी तुझे नाव फळ्यावर लिहीले
माझ्या नावासमोर
आणि खिशातल्या रूमालाने पुसून टाकले
डस्टर टेबलावर होता तरीही...
स्वतःपुरते ग्लोरिफीकेशन केले
आणि आनंद घेतला

वर्ग सारा शांत होता त्यावेळी
पण वर्गातल्या टेबलखुर्चीला, बेंचेसला
देवीच्या तसबिरीला आणि कच-याच्या डब्याला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...

मोरपिसासारखा तरंगत होतो त्या दिवशी
घरी येऊन रेडिओवर गाणी ऐकली इश्क मुहोब्बतची
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
वासरा सारखा हूंदडत राहिलो इकडे तिकडे दिवसभर
शांत होऊन घरी आल्यावर
एक पत्र लिहिलं तुला एकांतात
त्या दिवशी झोपही आली नाही रात्री ...

हा सारा दिवस अजूनही आठवतो आहे मला
तुला स्मरायचे कारण नाही
कारण यातले तुला काहीच ठाऊक नाही...

Thursday, January 20, 2011

जन्ता अमर्रे



साक्षर जनता । भूषण भारता

अडाणी जनता । ????
पेडगाव जनता । ????
येडगाव जनता । ????
मर्दानी जनता । ???
मुर्दाड जनता । ????
झापडेबाज जनता । ????
लफडेबाज जनता । ????
बुळी जनता । ????
चुळबुळी जनता । ????
अमीर जनता । ????
फ़कीर जनता । ????
जागृत जनता । ????
अमर जनता । ????

जन्ता अमर्रे

Monday, January 17, 2011

शाळा


आज साळत मास्तर आन् म्या फकस्त
मास्तर तापला बाळ्या बाकीची गबाळ कुठ गेली?
म्या म्हटल धोंड्याची म्हैस येली आन्शाम्याची माय मेली
म्या
चिडीचाप

मास्तर परत खवताळला
बाकीची गायबान कुठ गेली?
म्या म्हटल शिरप्या हिर खनतूया आन्दगड्या उसाला पाणी भरतूया
म्या
चिडीचाप

मास्तर आणिकच पिसाळला
आन् उरली सुरली घुबड कुठ मेली?
म्या म्हटल राधी भाकरी थापतीया आन्काशी धुन धुतीया
मास्तर म्हटला शाना हाईस सगळ्यांचा सातबारा माहीत असतूया तुला
एकला कायला तरफाडला साळत फुकन्या?
म्या
चिडीचाप

मास्तर म्हटला घ्ये लिहून थॉड फार पुस्ताक काढ
म्या म्हटल माझी पाटी कॉनीतरी चोरली फकस्त पुस्ताक हाय माह्यापाशी
मला वाटल मास्तर धडा शिकवीलपण ते आणिकच खवताळल
पळ घरी भूतखान्या उद्या ये पाटी घेऊन एकल्यासाठी टाळ कुटु काय म्या?
आज सुट्टी साळला
मास्तरन साळला टाळा ठोकला आन्पुण्यतीथी हाय म्हणून बोंबा मार म्हटला
पण उद्या साळत येऊन म्या काय करू?
माझा बा मला पाटी देनार पण ती गुराच शान भरायची
मला साळत जायचय पण मास्तर आड हाय आन् बा हिर
.

Friday, January 14, 2011

कळप


कळप करून राहण्याची
प्रवृत्ती पहिल्यापासूनची
रानटी... सनातन...


कुठल्या पुस्तकात वाचले
माहित नाही किंवा
कुठल्या मास्तरनं शिकवलय
वर्गात तेही आठवत नाही...


आपल्या जन्मापूर्वीही
या जगात कळप होते
आणि आपण ढगात गेल्यावरही
ते तसेच राहणार
इतकं मात्र ठसत गेलं
मनावर हळूहळू ...


पुस्तकाबाहेरच्या उघड्या- वाघड्या
नंग्या जगात घरापासूनच
राजकारण सुरु झालं
आईकडचे-वडीलांकडचे, सख्खे-चुलत,
सातबारा उतार्र्याची जमीन,
विहिरीचे पाणी,
आजोबाने बांधलेलं घर
ज्यात नांदत होतं मोठ्ठ खटलं
त्यात नांदत होत्या टोळ्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या नावाखाली...


घराबाहेर आपली पावले
पडली खरी पण
पुसत गेली
प्रत्येक आळीची वाट
ही आमची आळी
ही तुमची आळी ही वरची आळी
ही मधली आळी ही खालची आळी..
जन्माबरोबर चिकटली जात
जत्रेत गोंदवुन घ्यावी तशी
जी खोड़ता येणार नव्ह्ती
मरेपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीही
अगदी कोणीही
स्वतःसकट, मनापासून- मन मारून


जातीत राहून
फायदेही झाले आणि तोटेही
अंगात संचारला अहंकार आणि
स्वतःबद्दलची किळसही
आपण जातीच्या कोशात राहीलो
सुरक्षित, धुसमुसत अन भयभीतही


मानसिक-शारीरिक पातळीवर चालणारी
टोळयांची युद्धे आपण पाहिली
घरादारात लहानपणापासुन
प्रत्यक्ष अनुभवली हिंसा कित्येक रुपात
आपण आयते सापडलो
कळपात-टोळयात ...
तर कधी जाणीवपुर्वक सामील झालो...
कधी कधी नाईलाज सुद्धा होता आपला...


घसा फाटेस्तोवर घोषणा दिल्या
"टिंब टिंब की जय" म्हंटल
ताशे नगारे ढोल बेन्जो वाजवले
उत्सव साजरे केले जोरजोरात....
दबक्या हळु आवाजाताही आपण
एकी बांधली आपल्यापुरतीच
आपल्या विरोधात बंडाचे झेंडे घेउन आपलेच उभे
राहिले तेव्हा तितक्याच क्रुरपणे
आपण चिरडले
एखाद्या चिलटासारखे त्यांना
आणि ऐकीच बळ असं भलत्याच
कारणासाठी वापरल
आपली व्यवस्था पुन्हा घट्ट होण्यासाठी...


आपण ऐकमेकांत युद्धे केली
शह काटशहाचे राजकारण केले
रक्तपात केले एकाबाजूने
तर दुस-या बाजूने चिमुटभर फायद्यासाठी
परस्परात तह केले, युती केली, करार केले
छुप्यापणे किंवा उघडपणे...


आपल्या टोळयात आपण रंगीत चष्मे वाटले
आणि त्यातुन जगाकडे पहावे असा फतवा काढला
ज्यांनी चष्मे वापरायचे नाकारले त्यांचे डोळे काढले आपण
प्रत्येकाने सुधारणेची
भाषा केली असली तरी
छुप्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर
प्रत्येकाने तितकाच समसमान
कर्मठ पणा पाळला
मूळ संकल्पनांची सुरनळी केली
अन भोंदुपणा ओकत राहिलो


आपण भाषा शिकलो
स्वतः ची परक्याची
अमक्याची तमक्याची
शुद्ध अशुद्ध
फायद्याची तोट्याची
तसेच आपण इतिहास आणि
तत्वज्ञानाचेही
धड़े गिरवले...


आपण बर्र्याचादा चुकीचे असुनही
बरोबर कसे आहोत हे आत्मविश्वास पूर्वक सांगितले
तर कधी चुक बरोबर म्हणजे नेमके काय
यावर गोंधळ घातला
अन प्रश्नांचे घोंगडेच भिजत ठेवले ...
आपण बरोबर असून इतर कसे चुकीचे आहेत
यावर लंबी लंबी व्याख्याने भाषणे दिली
लेख लिहिले कादंब-या रचल्या,
नाटके चित्रपट केले...


कित्येक मूळ मुद्दे, तत्त्व, प्रश्न जाणवत असुनही
आपण त्याकडे सोइस्करपणे डोळेझांक केली
तर बिन महत्वाचे फसवे मुद्दे
मोठे करीत राहीलो, चघळत राहीलो
तर कधी रवंथ करीत राहीलो


आपण असे बरेच काही केले...
आपले जन्माला येणे आणि मरणे
हेच मूळात आपल्या हाती नव्हते
तरीही या दोघांच्या मधात
जो बुद्धिपुर्वक
( डोके असल्याने )
आपण जो उद्योग केला त्याचे काय???

Monday, January 3, 2011

फ्लेक्स

भूषण राक्षे यांच्या प्रदीर्घ
वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

शुभेच्छुक :- भूषण राक्षे

Friday, October 8, 2010

शरणागतीची कविता

सतत आठवत राह्तेस.

काल-परवापर्यंत विसरलो होतो तुला

पण संपूर्णपणे नाही

आता मात्र तुझ्याशिवाय सुचत नाही काहीबाही।

भानावर नसतोच बहुदा,

मनोराज्यात दंग असतो तुझ्यासोबत।

आजूबाजूची माणसे,आवाज, घटना, काळ

गोठून बसलेला असतो।

तुझे अव्यक्त प्रेम समजत असुनही

मी टाळत राहीलो

तुझ्य़ा स्वप्निल डोळ्यांना।

हे सत्य मला सतत बेचैन करत राहतं

आजकाल हरघडी।

स्वत:च आरोपीच्या पिंज~यात उभे राहून

कबुलीजबाब देतो मी पश्चातापाचा।

शरणागतीच्या कविता लिहिण्याखेरीज

दुसरे काहीच करु शकत नाही

हे पुरते लक्षात आलेले आहे,

उशीर झाला आहे सागळ्याच गोष्टींना

म्हणून आठवणी आणि कल्पनेच्या जगाबाहेर

एकही पाऊल पडत नाही माझे ।

मी अपराधी आहे तुझा...

शक्य झाल्यास माफ़ कर मला.

Wednesday, September 8, 2010

माउली

हे लडिवाळ मांजर माउली

कित्येकदा बोलतो ना मी तुझ्याशी तासनतास

किती निमुटपणे ऐकून घेतेस शांत राहतेस

प्रेमाने घुटमळतेस आसपास

माझं व्यक्त होण अणि तुझं अव्यक्तपणे

सारं काही समजाउन
घेणं

ना नफ़ा ना तोटा


ना व्यवहार ना अपहार

तुझ्या मुखावाटे बाहेर पडणा~या


भाषेतून माझं सनातन अनाथपणाच दु:ख

सनाथ होते अपरंपरापार

हे कारुण्यसिंधू गोमाते

तुझ्या डोळ्यांत बुडून जाताना

थिटं होत जातं

माझं गोठवून ठेवलेले दु:ख

तुझ्या व्याकुळ हंबरड्यात

स्वत:ला विरघळून टाकताना

मी सोशीकतेच्या मुळाक्षरांची

बाराखडी गिरवू लागतो

वेश्यांच्या चेह~यावरची दु:खं

स्वत:पेक्षा अगणित मोठी असल्याने

सहन होत नाहीत

मला म्हणून मी रस्ता टाळू पाहातो

मान खाली घालून तरीही

चेहरे दिसू लागतात आसपास।

त्यांच्या डोळ्यातील कुठल्याही

मजबूर प्रश्नापुढे मी

गुडघे टेकतो।

समस्त जगाच्या वतीने

मी माफ़ी मागतो तुमची

माझ्या आया-बहिनींनो।

स्वत:च्या दु:खाबद्दल मोजून मापून

लिहिणारा आणि बोलणारा मी

तुमच्यासमोर भणंग भिकारी आहे।

लाचारीपोटी समस्त जगापुढे

हात पसरणा~या आणि

सा~या जगाचे निखारे

पदरात घेणा~या माताभगिनींनो

मी तुमचा

अनंत काळचा अपराधी आहे।

मला माफ़ करा. मला माफ़ करा।




Saturday, August 7, 2010

घाटी

गणिताचे भोपळे नाचतात डोळ्यांसमोर कधेमधे
उगाचच वाटतं आपण 'ढ' होतो
लहानपणात इंग्रजीची खिचडी झाली अन्तरुणपणी मिसळ
आपण पुस्तकात वाचलं होतं की गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला
पण आता त्याला बरेच दिवस झाले म्हणून आपण शहरात आलो आणि म्हटलं चार शहाणपणाच्या गोष्टी शिकू
इथं सगळंच हाय आणि फाय
इथं सगळंच हाय आणि बाय
राम राम पाहुणं सखुच मेव्हण घरीच विसरून आलो का काय?
कसा निभाव लागायचा म्हणता म्हणता निभावलो
इथल्या व्यवस्थेचा भाग झालो पण आता इतरांसमोर अचानकपणे शहरी शहाणपणाने म्हणतो कसे आपण
घाटी लोकांना अक्कल नसते

:- भूषण राक्षे

Saturday, April 24, 2010

प्रार्थना

कडवट जिभेचे शब्द

करतात अस्वस्थ डोळ्यांना

डोळे मुकेपणीच बोलतात बोल

त्यांचे अर्थ असतात खुप गहीरे

विहीरी इतपत खोल

चालायचे असते पायांना ,

तुडवत काचांना

जखमा होतात तळव्यांना

वेदना सलत राहते

घुमत राहते मनात

दान मागणार्र्या हातात पडतो

भिक्षा म्हणून विस्तव

इच्छा आकांक्षांचे होतात कोळसे

तरीही

पोळलेले हात जोडून

प्रार्थना म्हणायची असते

सुर्याची

:- भूषण राक्षे