Friday, January 14, 2011

कळप


कळप करून राहण्याची
प्रवृत्ती पहिल्यापासूनची
रानटी... सनातन...


कुठल्या पुस्तकात वाचले
माहित नाही किंवा
कुठल्या मास्तरनं शिकवलय
वर्गात तेही आठवत नाही...


आपल्या जन्मापूर्वीही
या जगात कळप होते
आणि आपण ढगात गेल्यावरही
ते तसेच राहणार
इतकं मात्र ठसत गेलं
मनावर हळूहळू ...


पुस्तकाबाहेरच्या उघड्या- वाघड्या
नंग्या जगात घरापासूनच
राजकारण सुरु झालं
आईकडचे-वडीलांकडचे, सख्खे-चुलत,
सातबारा उतार्र्याची जमीन,
विहिरीचे पाणी,
आजोबाने बांधलेलं घर
ज्यात नांदत होतं मोठ्ठ खटलं
त्यात नांदत होत्या टोळ्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या नावाखाली...


घराबाहेर आपली पावले
पडली खरी पण
पुसत गेली
प्रत्येक आळीची वाट
ही आमची आळी
ही तुमची आळी ही वरची आळी
ही मधली आळी ही खालची आळी..
जन्माबरोबर चिकटली जात
जत्रेत गोंदवुन घ्यावी तशी
जी खोड़ता येणार नव्ह्ती
मरेपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीही
अगदी कोणीही
स्वतःसकट, मनापासून- मन मारून


जातीत राहून
फायदेही झाले आणि तोटेही
अंगात संचारला अहंकार आणि
स्वतःबद्दलची किळसही
आपण जातीच्या कोशात राहीलो
सुरक्षित, धुसमुसत अन भयभीतही


मानसिक-शारीरिक पातळीवर चालणारी
टोळयांची युद्धे आपण पाहिली
घरादारात लहानपणापासुन
प्रत्यक्ष अनुभवली हिंसा कित्येक रुपात
आपण आयते सापडलो
कळपात-टोळयात ...
तर कधी जाणीवपुर्वक सामील झालो...
कधी कधी नाईलाज सुद्धा होता आपला...


घसा फाटेस्तोवर घोषणा दिल्या
"टिंब टिंब की जय" म्हंटल
ताशे नगारे ढोल बेन्जो वाजवले
उत्सव साजरे केले जोरजोरात....
दबक्या हळु आवाजाताही आपण
एकी बांधली आपल्यापुरतीच
आपल्या विरोधात बंडाचे झेंडे घेउन आपलेच उभे
राहिले तेव्हा तितक्याच क्रुरपणे
आपण चिरडले
एखाद्या चिलटासारखे त्यांना
आणि ऐकीच बळ असं भलत्याच
कारणासाठी वापरल
आपली व्यवस्था पुन्हा घट्ट होण्यासाठी...


आपण ऐकमेकांत युद्धे केली
शह काटशहाचे राजकारण केले
रक्तपात केले एकाबाजूने
तर दुस-या बाजूने चिमुटभर फायद्यासाठी
परस्परात तह केले, युती केली, करार केले
छुप्यापणे किंवा उघडपणे...


आपल्या टोळयात आपण रंगीत चष्मे वाटले
आणि त्यातुन जगाकडे पहावे असा फतवा काढला
ज्यांनी चष्मे वापरायचे नाकारले त्यांचे डोळे काढले आपण
प्रत्येकाने सुधारणेची
भाषा केली असली तरी
छुप्या पद्धतीने वैयक्तिक पातळीवर
प्रत्येकाने तितकाच समसमान
कर्मठ पणा पाळला
मूळ संकल्पनांची सुरनळी केली
अन भोंदुपणा ओकत राहिलो


आपण भाषा शिकलो
स्वतः ची परक्याची
अमक्याची तमक्याची
शुद्ध अशुद्ध
फायद्याची तोट्याची
तसेच आपण इतिहास आणि
तत्वज्ञानाचेही
धड़े गिरवले...


आपण बर्र्याचादा चुकीचे असुनही
बरोबर कसे आहोत हे आत्मविश्वास पूर्वक सांगितले
तर कधी चुक बरोबर म्हणजे नेमके काय
यावर गोंधळ घातला
अन प्रश्नांचे घोंगडेच भिजत ठेवले ...
आपण बरोबर असून इतर कसे चुकीचे आहेत
यावर लंबी लंबी व्याख्याने भाषणे दिली
लेख लिहिले कादंब-या रचल्या,
नाटके चित्रपट केले...


कित्येक मूळ मुद्दे, तत्त्व, प्रश्न जाणवत असुनही
आपण त्याकडे सोइस्करपणे डोळेझांक केली
तर बिन महत्वाचे फसवे मुद्दे
मोठे करीत राहीलो, चघळत राहीलो
तर कधी रवंथ करीत राहीलो


आपण असे बरेच काही केले...
आपले जन्माला येणे आणि मरणे
हेच मूळात आपल्या हाती नव्हते
तरीही या दोघांच्या मधात
जो बुद्धिपुर्वक
( डोके असल्याने )
आपण जो उद्योग केला त्याचे काय???

No comments:

Post a Comment